मुक्या प्राण्यांमुळे मालकाचे वाचले प्राण!

0
2

साईमत, तळोदा : प्रतिनिधी
जनावरांना चारण्यासाठी गेलेल्या ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर बिबट्या व त्याच्यासोबत असलेल्या बछड्यांनी हल्ला केल्याची घटना दलेलपूर (ता. तळोदा) येथे गुरुवारी दुपारी घडली. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाच्या सुदैवाने पाळलेल्या म्हशींनी बिबट्या व त्याच्या बछड्यांच्या प्रतिकार करीत, त्यांना हुसकावून लावले. मुक्या प्राण्यांमुळे मालकाचे प्राण वाचले असून, या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

तळोदा शहरातील कॉलेज रोड परिसरात बादशाह अर्जुन भरवाड राहत असून, त्यांच्या मालकीच्या म्हशी व गायी आहेत. त्यांना चारण्यासाठी ते परिसरातील विविध भागांमध्ये नेहमीच जात असतात. गुरुवारीदेखील ते नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गेले होते. दलेलपूर शिवारातील डिगंबर सूर्यवंशी यांच्या केळीच्या शेतात म्हशी नेल्या होत्या. दरम्यान, त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेला बिबट्या व दोन बछड्यांनी दुपारी बादशाह भरवाड यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते दचकले, मात्र त्यांनी बिबट्यांचा प्रतिकार सुरू केला, त्यांनी आपला उजवा हात पुढे केल्याने बिबट्याने हाताला चावा घेतला व त्यांना जखमी केले. बिबट्यासोबतच्या झटापटीत ते जमिनीवर पडले. त्या परिस्थितीत बिबट्या त्यांच्यावर पुन्हा हल्ला करणार तेवढ्यात सोबत असलेल्या म्हशींनी बिबट्यांना शिंगांनी मारण्यास सुरवात केली. म्हशींनी जोरदार प्रतिकार करीत बिबट्या व बछड्यांना तेथून हुसकावून लावले. एकंदरीत मुक्या जनावरांमुळे आज मालकाचा जीव वाचला असल्याचे सर्वत्र चर्चिले जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here