Dam Is ‘Overflowing’ : वरुणराजाच्या दमदार बॅटींगमुळे धरणे ‘ओव्हरफ्लो’

0
11

जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमधील जलपातळी झपाट्याने वाढली, काही प्रकल्पही ओसंडून वाहू लागले

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जिल्ह्यात यंदा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात पाठ फिरविलेल्या पावसाने १५ ऑगस्टपासून जोरदार आगमन केले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी लावणे सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमधील जलपातळी झपाट्याने वाढली आहे तर काही प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत.

गेल्या दोन दिवसातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या-नाल्यांना पूर आला असताना पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागातील कपाशीचे पीक पाण्याखाली आहे तर काही नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, पारोळा तालुक्यातील बोरी नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच ओसंडून वाहू लागली आहे.

गिरणा २० तर मन्याड धरण १०० टक्के भरल्यानंतर जामदा डाव्या कालव्यातून २४५ क्युसेक पाणी सोडले आहे. या पाण्यामुळे एरंडोल, पारोळा व धरणगाव तालुक्यातील काही प्रकल्पांना बुस्टर मिळायला सुरुवात झाली आहे. गिरणा धरणाखाली मन्याड धरण असल्याने आणि ते पूर्णत : भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या नैसर्गिक विसर्गातून जामदा डाव्या कालवा खळाळून निघाला आहे तर गिरणा धरणातील जलसाठा २० टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे जामदा डाव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दोन्ही धरणातील पाणी जामदा डाव्या कालव्याच्या माध्यमातून कासोदा, एरंडोल, पारोळा फाटा, म्हसवे, नगावमार्गे भोकरबारी धरणात जात आहे.

हिवरा धरणातील जलसाठा ‘शून्यावर’

जिल्ह्यातील बोरी, सुकी, अभोरा, मंगरुळ धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत. या प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा आहे. केवळ हिवरा धरणातील जलसाठा शून्यावर आहे. त्यापाठोपाठ भोकरबारीत केवळ ८.८६ टक्के जलसाठा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here