साईमत, धुळे : प्रतिनिधी
काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा आणि राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे विरोधक हादरले आहेत. त्यात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता देशासह राज्यात परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी जाहीर सभेत व्यक्त केला. जिल्ह्यात आमदार पाटील यांच्या नेतृत्वात सोमवारी काँग्रेस जनसंवाद पदयात्रेला साळवे- चिमठाणे येथील क्रांतीस्मारकापासून सुरुवात झाली.
पदयात्रेत जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, ज्येष्ठ सुरेश देसले, प्रफुल्ल शिसोदे, सुनील चौधरी, माजी नगरसेवक दीपक अहिरे, दीपक देसले, बाजार समिती सभापती बाजीराव पाटील, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, शिंदखेडा तालुका महिलाध्यक्षा छाया पवार, शामकांत पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, सदस्या सुरेखा बडगुजर, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील, इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद शिसोदे, समद शेख, हेमराज पाटील, पांडुरंग माळी, भानुदास गांगुर्डे, दोंडाईचाचे अध्यक्ष वसंत कोळी, अर्चना पाटील, बानुबाई शिरसाट, ऋषीकेश पाटील, राहुल माणिक आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. गावागावातील पदयात्रेत आमदार पाटील आणि सहकाऱ्यांनी शेतकरी, शेतमजूर, हातगाडी विक्रेत्यांशी संवाद साधला. खलाणेसह शिंदखेडा येथे सभा झाली.
जनतेच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी चीड
आ.पाटील म्हणाले, देशात सरकारच्या दडपशाहीमुळे भीतीचे वातावरण आहे. वाढती महागाई, महिलांवर अत्याचार, शेतीमालास भाव नाही, जातीय तेढ निर्माण करणे, विरोधकांचा आवाज दाबून लोकशाही- संविधान संपविण्याचे कटकारस्थान आदींमुळे जनतेच्या मनात सत्ताधाऱ्यांविषयी चीड आहे. जनतेच्या मनातील भिती दूर होण्यासाठी पक्षातर्फे राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रा सुरू झाली. जिल्हाध्यक्ष सनेर यांनी मार्गदर्शन केले. नेत्यांशी चर्चेवेळी शेतकऱ्यांनी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर व्हावा, कर्जमाफी मिळावी, अशी मागणी केली.