साईमत, कळवण : प्रतिनिधी
कपालेश्वर येथील आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉ. विरेंद्र आवारे यांनी मद्यधुंद अवस्थेत प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला दाखल करुन घेतले नाही. सदर महिलेला डांगसौंदाणे येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिली. यावरुन संतप्त ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग एकीकडे गरोदर महिला, प्रसूती, आणि कुपोषणावर कोट्यवधींचा खर्च करत असताना ग्रामीण भागात मात्र याच आरोग्य यंत्रणेचे शिलेदाराकडून या मोहिमेला हरताळ फासताना दिसत आहेत.22 ऑगस्ट रोजी रात्री अकराला खडकी (ता. कळवण) येथील कल्पना भोये यांना त्यांच्या कुटुंबियांनी प्रसुतीसाठी कपालेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वीरेंद्र आवारे यांनी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या गर्भवतीस आरोग्य केंद्रात दाखल करून न घेता डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत हेळसांड केली. त्यामुळे संतप्त झालेल्या कपालेश्वर ग्रामस्थांनी याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.येथे मद्यधुंद अवस्थेत ड्यूटीवर असलेल्या डॉ. वीरेंद्र आवारे यांनी गर्भवतीस आरोग्य केंद्रात दाखल करून घेण्यास नकार देत डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. याव्ोळी गर्भवतीच्या वडिलांनी व नातेवाईक यांनी विनंती करूनही दारुच्या नशेत असलेल्या डॉक्टर आणि त्याच्या एका जोडीदाराने सर्वांना रुग्णालयातून हाकलून दिले. यानंतर नातेवाईकांनी डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात गाठले. बुधवारी (ता.23) सकाळी रात्री घडलेला सर्व प्रकार काकजी बागूल यांनी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना सांगितला. संतप्त ग्रामस्थांनी सरपंच मनोहर ठाकरे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. याठिकाणी डॉ.आवारे हे दारुच्या नशेतच असल्याचे सर्वांना दिसले.यानंतर आदर्श गाव किकवारीचे केदा काकुळते आणि ग्रामस्थ यांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यास केंद्रातून हाकलून लावत घटनेची संपूर्ण माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांना देत अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. याव्ोळी ग्रामपंचायत सदस्य गोविंदा ठाकरे, सुरेश महाले, पोपट पवार, साहेबराव अहिरे, केशरबाई बागूल, उत्तम बागूल, तुषार बागूल, माधव ठाकरे, लहानू पवार, रूपाली बागूल उपस्थित होते.