साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यात पावसाने अवकृपा केली आहे. त्यामुळे अनेक गावात पिके सुकू लागली आहेत. अशातच तालुक्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी चाळीसगाव तालुका विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी एका पत्रकाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
तालुक्यात काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांसोबत बोललो असता देवळी, अंधारी, तळेगाव, माळशेवागे तसेच पाटणादेवी परिसर डोंगरपट्टा आणि तालुक्यातल्या इतर अनेक गावात यावर्षी दुबार पेरणी झाली. दुसऱ्यांदा पेरणी करुनही पिक एक वितभरही वाढलेले नाही. ऑगस्ट महिना अर्धा झाला. आता पाऊस येऊनही त्याचा उपयोग होणार नाही. कारण ही पिकं किती उत्पादन देतील यात शंका आहे.
अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे ट्रँकर सुरु आहेत, अशी परिस्थिती असताना या गावांचे सरसकट पिक विमा उतरवून घ्यावा. त्यामुळे ती मदत शेतकऱ्यांना मिळेल. प्रशासनाने आतापासून दुष्काळसदृश्य परिस्थितीचा शासनाकडे वस्तुनिष्ठ पाठपुरावा केला तर पुढे उशीर होणार नाही.
गेल्यावर्षी पंचनामे होऊनही मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मागीलवर्षी काय व कशा चुका प्रशासनाकडून झाल्या त्या तपासून पहाव्यात आणि यावर्षी योग्य आणेवारी आणि तालुक्याची योग्य परिस्थिती शासन दरबारी मांडून शेतकऱ्यांना मदत मिळेल, त्याची काळजी तालुका प्रशासनाने घ्यावी, अशी मागणीही प्रफुल्ल साळुंखे यांनी केली आहे.