साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव कजगाव
कजगाव ता भडगाव कजगाव परिसरात पावसाने मारलेल्या दांडीने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे, त्यामुळे कजगाव परिसराला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भोरटेक ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. ह्या आशयाचे निवेदन भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले तर जिल्हाधिकारी व प्रांत अधिकारी यांना देखील सदरील निवेदन पाठवण्यात आले आहे.
भोरटेक ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अजूनही बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. भोरटेक व कजगाव परिसरात पावसाने दांडी मारल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे ,ह्या भागातील शेतकरी पावसाअभावी हवालदिल झाला असून शेतात पेरणी करूनही पावसाअभावी पीक जोर धरत नाही शेतकऱ्यांकडे असलेले पैसे व बाहेरून व्याजाने आणून शेतकऱ्याने शेतातील मशागत व शेतातील पेरणी केली आहे.
परंतु परीसरात पावसाने मारलेल्या दांडीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, तसेच भडगाव तालुक्यात समाधान कारक पाऊस असल्याचे भासवण्यात आले असून भोरटेक व कजगाव परीसरात पाहिजे तसा पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून पीक हातात येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी सदरील सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई द्यावी व कजगाव परिसराला कोरडा दुष्काळ जाहीर करावा व आमच्या निवेदानाचा व शेतकऱ्यांच्या भावनेचा सहानुभूती पूर्वक विचार करण्यात यावा अशी अपेक्षाही यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना केली आहे यावेळी भोरटेकचे माजी सरपंच उमेश देशमुख शेतकरी नेते अशोक देशमुख अशोक महाजन संजय महाजन अर्जुन पाटील आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत,