साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना दुष्काळाच्या कवडीचाही फायदा झालेला नाही. मन्याड धरणाच्या पाण्यावर शेतकरी अवलंबून असल्याने गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून गिरणा धरणातून मन्याड धरणात पाणी टाकून शेतकऱ्यांना शेतीसाठी व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिरसगाव येथे शेतकरी दिलीप पाटील यांनी गुरुवारी, ७ मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
शासनाने दुष्काळाच्या सर्व सुविधा शेतकऱ्यांना देण्यात याव्यात, तर मन्याड धरणाच्या पाण्यावर शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मन्याड धरण परिसरात पर्जन्यमान चांगले होत नसल्यामुळे मन्याड धरण भरत नसल्यामुळे गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करावा, गिरणा धरण पावसाळ्यात भरल्यानंतर अतिरिक्त पाणी मण्याड धरणात टाकल्यास पाण्यापासून वंचित असलेले मन्याड धरण परीसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि शेती पिकांना व गुरेढोरांना पाण्याची सुविधा उपलब्ध होईल तसेच मन्याड धरणाची उंची वाढवून कॅनॉलची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास वीज पुरवठा सुरळीतपणे करावा.
गिरणा धरणातून मन्याड धरणात पाणी टाकण्याची मागणीसाठी मन्याड धरण परिसरातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना २७ रोजी निवेदन देऊन मागणी केली होती. त्याची दखल घेतली न गेल्यामुळे म्हणून शिरसगाव येथील शेतकरी दिलीप फकीरा पाटील यांनी ७ मार्च २०२४ रोजीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. याप्रसंगी शिरसगाव व पंचक्रोशीतील शेतकरी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसणारे सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील शिवा काशीद यांचे वंशज अनिल काशीद उपस्थित होते.