डॉ. दाभोलकरांचे मारेकरी मोकाट ही खेदाची बाब:अशोक शाह

0
2

साईमत, शिंदखेडा: प्रतिनिधी
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे कृतीशील विचारवंत होते. त्यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आयुष्यभर कार्य केले व अखेर बलिदानही दिले. विचार करणारा, प्रश्‍न विचारणारा, कार्यकारणभाव तपासणारा समाज त्यांना घडवायचा होता. विचारांचा प्रतिवाद विचारांनी करता येत नाही म्हणून त्यांचा गोळ्या घालून खून झाला त्याला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. पण अद्याप न्यायालयात निर्णय होऊन मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे असे प्रतिपादन अशोकभाई शाह यांनी केले.

महाराष्ट्र अंनिसच्या शिंदखेडा शाखेतर्फे आयोजित केलेल्या अभिवादन निर्धार सभेत ते बोलत होते. येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त ‘आठवणीतील डॉ. दाभोलकर’ या विषयावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या व्यक्तीमत्वाच्या अनेक पैलूंवर प्रा. दीपक माळी, प्रा. गजानन शास्त्री, प्रा. सतिश पाटील, प्रा.अजय बोरदे, भिका पाटील, प्रा. सोमनाथ अहिरराव, प्रा. गोपालसिंग परमार, प्रा. संदीप गिरासे, देवेंद्र नाईक यांनी मनोगतातून प्रकाश टाकला. डॉ. दाभोलकरांचा साधेपणा, शिस्त, नियमित व्यायाम, व्ोळेचे नियोजन, कितीही विरोधकाला शांतपणे समजावून सांगण्याची शैली, नम्रपणे पण ठामपणे मुद्देसूद मांडणी, संघटन कौशल्य, अफाट कार्यक्षमता, दांडगा जनसंपर्क, विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत असलेला संवाद, समाज बदलाच्या प्रक्रियेवरील दृढ विश्‍वास, संविधान मूल्यांबाबतची तळमळ, संव्ोदनशीलता, कार्यकर्त्यांशी जपलेले भावनिक नाते या बाबतीत अनेक आठवणींना उजाळा दिला. शिंदखेडा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून शाखा कार्यरत आहे. त्यामुळे दाभोलकरांचा संपर्क, सहवास लाभलेले अनेक कार्यकर्ते येथे कार्यरत आहेत.

या प्रसंगी ‘सॉक्रेटिस ते दाभोळकर – पानसरे व्हाया तुकाराम’ हे रिंगण नाट्य दाखविण्यात आले व उपस्थित सर्वांना अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या मासिकाचे अंक देण्यात आले. शेवटी सर्वांनी उभे राहून हातातील मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अभिवादन गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. परेश शाह यांनी केले. सभेला माजी प्राचार्य एस. डी. गुजराथी, नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी, प्रा. पी. टी. पाटील, पत्रकार प्रा. चंद्रकांत डागा, जितेंद्र मेखे, परेश एन. शाह, क्रांतीज्योती पतसंस्थेच्या चेअरमन सुषमा अहिरराव, संचालिका रंजना पाटील, प्रमोद राजपूत यासह मोठ्या संख्येने महिला – पुरुष सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबोध शाह, योगेश गिरासे, संदीप साळुंखे, भूपेंद्र लोहार, दिपक तावडे, जयपाल गिरासे, प्रविण गिरासे, अनिल माळी व प्रदीप गिरासे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here