साईमत, जामनेर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राचे ६ हजार रुपये प्रतिवर्ष देण्यात येतात. इथुन पुढे राज्य सरकारही वर्षाला ६ हजार रुपये हप्ता वितरित करणार आहे. हप्ता नियमित प्राप्त होण्यासाठी ईकेवायसी करणे व बँक खाते क्रमांक आधार सोबत लिंक करणे अनिवार्य असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी सांगितले.
तालुक्यातील २ हजार ६७८ शेतकऱ्यांचे इकेवायसी करणे व २ हजार ५२२ लोकांचे आधार लिंक करणे सद्यस्थितीत प्रलंबित आहे. मागील हप्त्यावेळी ज्यांचे इकेवायसी झालेले नव्हते. अश्या लाभार्थ्यांना सुट म्हणून हप्ता वितरित केलेला होता. इथुन पुढील हप्ता हा इकेवायसी पूर्ण असेल तरच वितरित करण्यात येईल. इकेवायसी पूर्ण नसल्यास लाभार्थी हप्त्यापासून वंचित राहील. ज्यांचे इकेवायसी प्रलंबित आहे त्यांनी ई-सेवा केंद्रावर जाऊन आपली इकेवायसी पूर्ण करावी. तसेच इकेवायसी झाली आहे किंवा नाही त्याची खात्री संबंधित गावच्या कृषी सहाय्यक यांच्याकडे करावी. तसेच बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी बँकेत जाऊन करावे. लाभार्थी मयत असल्यास त्याचे मृत्यू प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी केले आहे.