जळगाव : प्रतिनिधी
राज्यभरात गणेश विसर्जन करताना अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत. नाशिक, मुंबईसह काही ठिकाणी मुर्ती विसर्जन करताना काहींचा बुडून मृत्यू झाला आहे. काही ठिकाणी वाहनांचा अपघातही घडला आहे. केवळ काळजी न घेतल्यामुळे लोकांनी विघ्न ओढवून घेतले आहे. विघ्नहर्त्याला निरोप देताना विसर्जन निर्विघ्न कसे पार पडेल हे पाहिले पाहिजे. खान्देशातही धुळे, जळगाव, नंदुरबारात अप्रिय घटनांमुळे गालबोट लागले आहे.
जळगावात वाद, सात
जणांवर गुन्हा दाखल
कोर्ट चौकात गणपती विसर्जन मिरवणूकीच्या रांगेत नंबर लावण्याच्या कारणावरून मंडळांमध्ये बाचाबाची व हाणामारी झाल्याचा प्रकार गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी घडला. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. मिरवणूकीत रांग लागण्याच्या कारणावरून काही जण गोंधळ घालत होते. शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार संगीता खांडरे करीत आहेत.
मुक्ताईनगरात तरूण बुडाला
मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील पाझर तलावात रात्री उशिरा ३० वर्षीय तरुण बुडाला. अंधार असल्यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. फिरीशा पवार (रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
धुळ्यात चिमुकलीसह ४ भाविक
टेम्पोच्या धडकेत जख्मी
धुळे : शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी जात असलेल्या चार भाविकांना भरधाव टेम्पोने धडक दिली. या धडकेत तीन वर्षीय चिमुकलीच्या पायावरून टेंपो गेला त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. एका १४ वर्षीय मुलाच्या पोटावरुन टेम्पो गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे. धुळे शहरातील जुना आग्रा रोड मार्गावर ही घटना घडली. गणेश मूर्ती विसर्जनासाठी निघालेल्या एका टेम्पोचा अचानक ब्रेक फेल झाला. या टेम्पोने रस्त्यावरून जाणाऱ्या या चारही भाविकांना धडक दिली. या भीषण घटनेत ३ वर्षीय सायली जोहरी तसेच तिची आई जस्सी जोहरी आणि पिंकी जोहरी हे तिघेही जखमी झाले आहे. अपघातानंतर या तिघांनाही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.