नागरिक-प्रशासन थेट संवादासाठी लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन
साईमत/जळगाव /प्रतिनिधी :
जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित व वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा लोकशाही दिन सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात पार पडणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या निर्देशांनुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. नागरिकांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडून त्यावर तातडीने सुनावणी घेणे व निराकरण करणे, तसेच प्रशासन व नागरिक यांच्यात थेट संवाद प्रस्थापित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या अर्जदारांनी यापूर्वी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात अर्ज सादर केले असून त्या अर्जांवर एक महिन्याच्या आत कोणतेही उत्तर मिळालेले नाही, अशा नागरिकांनी संबंधित कागदपत्रांसह जिल्हास्तरीय लोकशाही दिनाला उपस्थित राहावे.
लोकशाही दिनात केवळ वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारींचीच सुनावणी करण्यात येणार असून, अर्जदारांनी आपल्या अर्जाची प्रत, संबंधित कागदपत्रे तसेच तालुका स्तरावर सादर केलेल्या निवेदनाची प्रत सोबत आणणे आवश्यक आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण अधिक गतीने होण्यास मदत होणार असून प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
