साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर
धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक कन्या शाळेत शुक्रवारी, १ डिसेंबर रोजी गणवेश संचासह बूट, मोजेचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील, पं.स.चे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सरपंच लक्ष्मी कोळी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील, शरद कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ पाटील, सदस्य मंगला बाविस्कर, धरणगावच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, पाळधीचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी मुकुंद नन्नवरे, डॉ.भावना भोसले, प्रमोद सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. जि.प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत शासनाचे ध्येयधोरणे आणि प्रत्यक्ष ध्येयधोरणे शासन स्तरावर लोकप्रतिनिधींनी करावयाचा पाठपुरावा याबाबत संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मुलींच्या सुरक्षितता आणि भविष्यातील येणारे आव्हानाबाबत मुलींनी स्वतः सक्षम व्हावे, यासाठी त्यांनी उपाययोजना म्हणून प्रशिक्षण आयोजित करण्याचे सांगितले. समाजात मुलींनी आपल्या आई-वडिलांचा मान सदैव उंच राहण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक सुरक्षिततेबाबत गंभीर असणे आवश्यक आहे. याविषयी त्यांनी सर्व मुलींना समर्पक शब्दात मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश बाविस्कर, सूत्रसंचालन विद्या चौधरी तर आभार श्रीमती उषा निकम यांनी मानले.