साईमत चाळीसगाव प्रतिनिधी
येथील नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर 425/क मधील धुळे रोड टच के.आर.कोतकर कॉलेजच्या जुन्या कँटीनपासून ते ट्रामा रुग्णालयाच्या कंपाउंडच्या भिंतीपर्यंत 1.17 हे. आर (पावणे तीन एकर) जागा नगरपालिकेने स्मशानभूमीसाठी मंजूर केलेली आहे. यासंदर्भात ठराव क्रमांकानुसार जागा मंजूर केली आहे. के.आर.कोतकर कॉलेजजवळील 1 एकर जागा हिंदू स्मशानभूमीसाठी मंजूर असतांना 20 ते 22 वर्षांपासून हिंदू समाजाची (हिंदू धर्मातील सर्व जातीचीं) अंत्यसंस्कारासाठी अवहेलना का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे यासंदर्भात जन भावनांचा आदर करून लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्येकर्ते किरण आढाव यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किरण आढाव यांनी दिला आहे.चाळीसगाव नगरपालिका यांनी 12 जुलै 1991 रोजीचा ठराव क्र.1123, 1 नोव्हेंबर 1993 रोजीचा ठराव क्र. 359, 18 मार्च 2013 रोजीचा ठराव क्र.385 पारित करण्यात येऊन मिळकतीच क्षेत्र 1 हे.17 आरपैकी 1 एकर हिंदू स्मशान भूमीसाठी, 1 एकर मुस्लिम स्मशान भूमीसाठी, 0.37 आर क्षेत्र मांग गारुडी समाजासाठी मंजूर केलेले आहे. रेल्वे पलीकडील धुळे रोड, मालेगाव रोड, करगाव रोड स्थित पंचशील नगर, जुना मालेगाव रोड नाका, शिव कॉलनी, पोस्टल कॉलनी, नवलेवाडी, आदर्श नगर, श्रीकृष्ण कॉलनी, प्रभू रामचंद्र नगर, डेराबर्डी परिसर परिसर, वामन नगर, शंभो नगर परिसरात 1.25 ते 1.50 लाख हिंदू समाज बांधवांची लोकसंख्या आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येला अंत्यसंस्कारांसाठी 4 ते 5 कि.मी. दूर नदी किनारी जावे लागते.
8 जून 2022 रोजीच्या प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पश्चिमेकडील 0. 40 हे आर (1 एकर) जागा मुस्लिम स्मशानभूमीसाठी पारित (प्रदान) केलेली आहे. लोकसंख्येच्या गणितानुसार रेल्वे पलीकडील परिसरात मुस्लिम समाज बांधवांची संख्या अंदाजे 1500-2000 असतांना स्मशानभूमीसाठी जागा पारित होऊ शकते तर मग 1.25 ते 1.50 लाख लोकसंख्या असलेला हिंदू समाजाच्या स्मशानभूमीसाठी 1 एकर जागा मंजूर असतांना जागा पारित का होत नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.