हतनूरचे 41 दरवाज्यांतून विसर्ग

0
4

साईमत जळगाव प्रतिनिधी

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने तापी, पूर्णा या नद्यांना पूर आला असून, धरणाच्या जलपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी नऊला धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून, तापी नदीपात्रात सद्यःस्थितीत 4,23,394 क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पूर्णा व तापी नदीक्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस होत आहे. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हतनूर धरणात पाण्याची मोठी आवक वाढली आहे. सद्यःस्थितीत धरणाची जलपातळी 212.610 मीटर असून, धरणात एकूण 309.40 दशलक्ष घनमीटर अर्थात 79.74 टक्के जलसाठा आहे. थेट संचयन 176.40 दशलक्ष घनमीटर अर्थात 69.92 टक्के आहे.

तसेच तापी नदीला येणारा पूर पाण्याचा येवा लक्षात घेता, शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे आणि शहादा तालुक्यातील प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पातून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्व दरवाजे तीन मिटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे एक लाख ते दिड लाख क्यूसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. तरी तापी काठच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही गावांमध्ये शिरले पाणी

मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे खडकी मेंढोदे, भोकरी, पातोंडे या तापी काठच्या तीन गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्या गावातील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. तेथे बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. कुठेही नुकसान झालेले नाही. अंतुर्ली येथील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. रावेर तालुक्यातील खिरवड, ऐनपुर, नींबोल, निंभोरा शिम, धुरखेडा या गावात पाणी शिरल्याने तेथील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here