जरंडीच्या खडकी नदीला दुसऱ्यांदा पूर
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :
सोयगावसह परिसरात सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता अचानक तीस ते चाळीस मिनिटे धुव्वाधार पावसाने हजेरी लावल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. जरंडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने जरंडीत खडकी नदीला जुलै महिन्यानंतर दुसऱ्यांदा सोमवारी पूर आला होता. त्यामुळे महिन्याभरानंतर दुसऱ्यांदा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते.
सोयगाव परिसरात ८ ऑगस्टपासून अकरा दिवसांचा खंड पडला होता. त्यामुळे कपाशीच्या पिकांनी ऊन धरले होते. मात्र, सोमवारी दुपारी झालेल्या पावसाने कपाशी, मका पिकांना तग धरला आहे. मात्र, तालुक्यातील निम्म्या भागात पाऊस नसल्याने ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती होती.
दहा गावात पावसाची जोरदार हजेरी
सोयगावसह जरंडी, निंबायती, बहुलखेडा, कवली, उमर विहिरे, निमखेडी, घोसला, बनोटी, वाडी, नायगाव, पळाशी, हनुमंतखेडा आदी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली तर इतर भागात पावसाचा थेंबही नव्हता. मात्र, सोयगाव शहरासह कंकराळा, जरंडी, निंबायती, रामपुरातांडा, बहुलखेडा, कवली, उमर विहिरे, निमखेडी, घोसला अशा दहा गावात जोरदार पावसाने हजेरी लावली होती.