धुळे मनपाला १२८ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित

0
29

साईमत, धुळे, प्रतिनिधी

महानगरपालिकेचा प्रमुख आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर व पाणीपट्टीपोटी धुळे महानगरपालिकेला यावर्षी तब्बल १२८ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा हा आकडा सुखावणारा असला तरी चालू मागणी अर्थात दरवर्षी मिळू शकणारे उत्पन्न ३६.६९ कोटी रुपये आहे. अर्थात सध्या दिसत असलेल्या १२८ कोटी रुपयांच्या उत्पन्नात थकबाकीचे प्रमाण तब्बल ९१ कोटी रुपये आहे. वर्षाकाठी यातून काही कोटी रुपये वसुली होते. उर्वरित आकडा पुन्हा थकबाकीत जातो. त्यामुळे महानगरपालिकेपुढे खरी समस्या थकबाकी वसुलीचीच आहे.

विशेषतः ‘ड’ वर्ग महानगरपालिकांचा प्रमुख आर्थिक स्त्रोत मालमत्ता कर, पाणीपट्टी यावरच अवलंबून आहे. इतर विविध कामे केंद्र, राज्य शासनाच्या योजनांमधून होतात. अर्थात यात महानगरपालिकेलाही थोडाफार हिस्सा भरावा लागत असला तरी शहर विकासाची मोठी भिस्त केंद्र, राज्य सरकारांवर आहे.

धुळे महानगरपालिकेला मालमत्ता कर, पाणीपट्टी व्यतिरिक्त इतर आर्थिक स्त्रोत निर्माण करता आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पदाधिकारी, नगरसेवकांकडून अनेक उपाय सुचविले जातात. पण, ते केवळ बोलण्यापुरते ठरतात. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी ना प्रशासन पुढाकार घेते ना उपाय सुचविणारे पदाधिकारी, नगरसेवक यासाठी पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे आजही सर्व भिस्त मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीवर आहे. या एकमेव प्रमुख आर्थिक स्त्रोताची मोठी शोकांतिका आहे. दरवर्षी चालू मागणी केवळ ३६-३७ कोटी रुपये आहे. त्यामुळे मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या रूपाने महानगरपालिकेचा प्रमुख आर्थिक स्त्रोतही तुलनेने तुटपुंजा ठरतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here