
महिला कीर्तनकारांनी कीर्तनरूपी सेवा देत समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केले.
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
पाचोरा येथे आयोजित राज्यस्तरीय महिला सप्ताहा कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने भक्तीभावात उत्साहात पार पडला. सात दिवस चाललेल्या या सप्ताहात महाराष्ट्रभरातील नामांकित महिला कीर्तनकारांनी कीर्तनरूपी सेवा देत समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केले.सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संस्थेच्या अध्यक्षा सुनिताताई पाटील यांनी सुश्राव्य, हृदयस्पर्शी कीर्तन सादर केले. कीर्तनातून त्यांनी समाजप्रबोधनात्मक अनेक मुद्दे मांडले.
त्या म्हणाल्या की, मंदिरात जाऊन पिंडीवर पाणी टाकण्यापेक्षा आपल्या घरातील दोन जिवंत देव सासू-सासरे यांची सेवा करा. त्यांच्या सेवेमध्येच खरा महादेव आहे.तसेच मुलींना जसे संस्कार देतो तसेच मुलांना देखील योग्य संस्कार देणे अत्यावश्यक आहे. मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवून त्यांना संस्कारशील बनवा, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मी जिवंत असेपर्यंत अनाथ, गरजू व बेघर मुलांसाठी कार्य करत राहणार आहे. ज्या लेकरांना कोणी नाही, त्यांना मी स्वतःच्या लेकरांपेक्षा अधिक प्रेम देईल.
संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी कीर्तनकार व कथाकार बनले असून, या विद्यार्थ्यांनीही कीर्तनानंतर आपली भावना व्यक्त केली. “ताई व महाराजांनी आम्हाला व्यासपीठावर उभे राहण्याची आणि बोलण्याची ताकद दिली. आज आम्ही महाराष्ट्रभर समाज प्रबोधनासाठी फिरतोय, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तीपर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ताज हल्ल्यातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ तसेच डोंगराळे (ता.मालेगाव) येथील मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मेणबत्ती व टॉर्च लावून मौन पाळण्यात आले.
सुनीताताईंनी याप्रसंगी सीमेवरील जवानांचे दुःख, त्याग व कर्तव्य मांडत देशभक्तीपर व्याख्यान दिले. जवानांना मिळणारा पगार दिसतो, पण त्यांच्या मागील वेदना दिसत नाहीत.
समाजाने त्यांना मानाचे स्थान द्यायला हवे,” असे त्यांनी सांगितले.कीर्तनाचा समारोप देशभक्तिपर गीताने झाला. सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक सुभाष चौधरी सर यांनी केले, तर आभार संस्थेचे ह.भ.प. योगेश महाराज यांनी मानले. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


