सोनी नगरात सात जोडप्यांच्या हस्ते महादेवाची ‘महाआरती’
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
श्रावण महिन्यात सोमवारी शिवमूठ वाहण्याचे मोठे महत्व आहे. आपल्या आयुष्यात कायम सुख-शांती, समृद्धी नांदावी. घरात भरभराट व्हावी, अन्नधान्याची कमी भासू नये, यासाठी जागृत स्वयंभू महादेवाला सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी पहाटेपासून तिसऱ्या सोमवारी शिवभक्तांनी धान्याची शिवमूठ वाहिली. सोनी नगरातील मनोकामनापूर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागृत स्वयंभू महादेव मंदिरात सोमवारी सकाळी सात जोडप्यांच्या हस्ते जलाभिषेक, दुग्धाभिषेक, १०८ बेलपत्र, महादेवाचे नामस्मरण करून शिवभक्तांनी उपासना केली.
तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ हिरवे मूग होते. श्रावण महिना असल्याने मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी होती. प्रत्येक भाविकांनी उजव्या हाताच्या मुठीत बसेल तेवढे मूग घेण्यात आले. त्यानंतर धान्य थोडे पाण्याने ओले करून मूठ उभी करून पाणी वाहत वाहत तीनवेळा शंकरांच्या पिंडीवर अर्पण केली. तसेच प्रत्येकवेळी ‘शिवा…शिवा…महादेवा… माझी शिवामूठ ईश्वर देवा… मनातील माझी इच्छा पूर्ण कर…’ असे नामस्मरण करण्यात आले.
महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेकासह दुग्धाभिषेक
जागृत स्वयंभू महादेवाची सकाळी ८ वाजता पूजा करण्यात आली. यावेळी सोपान-जयश्री पाटील, गजानन-सीमा शिंपी, समाधान-मोहिनी पाटील, दिलीप-निकी पंडित, संजय-बेबीबाई बोरनारे, पिंटू-शोभा पंडित, सागर-प्रणिता पाटील अशा सात जोडप्यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, बेलपत्र त्यानंतर पूजा-अर्चा करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी नरेश बागडे, मधुकर ठाकरे, सरदार राजपूत, नारायण येवले, माधुरी येवले, निलेश जोशी, कल्याणी राजपूत यांच्यासह सोनी नगरासह परिसरातील भाविक, भक्तगण उपस्थित होते.