सोयगाव तालुक्यातील शेतकरी सापडले अडचणीत
साईमत/सोयगाव/प्रतिनिधी:
रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाच्यावतीने फळबाग, गाय गोठा, सिंचन विहीर या योजना राबविल्या जातात. फळबाग लागवडीसाठी सात लाख विहीर व गाय गोठा योजनेसाठी अनुक्रमे दोन व चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. परंतु योजनेचे प्रस्ताव मंजूर होऊन अनेक दिवस होऊनही त्याचे अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकरी वंचित राहिले असून आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
फळबाग लागवडीसाठी सात लाख रुपयापर्यंत तर विहीर आणि गाय गोठा योजनेसाठी अनुक्रमे दोन लाख व चार लाख रुपये शासनाकडून लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. गाय गोठा व विहिरीसाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करून या कामासाठी पैसे खर्च केले. एकीकडे शेतकऱ्यांना झालेल्या कामांची रक्कम जमा झाली नाही. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन कामांची मंजुरी व देखे खात्यात वर्ग करण्यासाठीचे फोटो बंद केले आहे. शेतकऱ्यांनी कामांची दिलेले बिले संबंधित रोजगार हमी विभागातील कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन केले नसल्याने शेतकऱ्यांना कुशल बिले मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.