साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
हद्दपार आरोपीला ताब्यात घेण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय भानुदास पाटील (वय २५,रा.लक्ष्मी नगर, चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, अक्षय पाटील हा उपविभागीय दंडाधीकारी यांच्या आदेशाचा भंग करुन कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीररित्या चाळीसगावात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पो.कॉ दीपक चौधरी हे चाळीसगाव बसस्टॅण्डच्या मागील बाजूस एका टपरीजवळ गेले असता तेथे अक्षय पाटील हा आढळून आला. पो.कॉ चौधरी हे अक्षयला ताब्यात घेण्यास गेले असता त्याने हुज्जत घालून, तुमच्याकडून माझे जे होईल ते करुन घ्या. मी पोलीस स्टेशन ला येणार नाही, असे म्हणून त्यांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू पो.कॉ चौधरी हात न सोडल्यामुळे अक्षयने त्यांच्यासोबत धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी अक्षय पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील सपोनि दिपक बीरारी हे करीत आहेत.