जंतुनाशके, घंटागाडी दुरुस्ती बिलापोटी मुख्याधिकाऱ्यांची अवाजवी रक्कमेची मागणी

0
10

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील एका ठेकेदाराकडून केलेल्या कामाच्या बिलापोटी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ह्या अवाजवी रक्कमेची मागणी करत असल्याने संबंधित ठेकेदार सुरेश (पप्पु) पाटील यांनी गुरुवारी, २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आमरण उपोषणास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, मराठा सेवा संघ, क्षत्रिय गु्रप, वंचित बहुजन आघाडी, अखिल मराठा सेवा प्रतिष्ठान, समता सैनिक दल, मराठा क्रांती मोर्चा, पाचोरा तालुका पत्रकार संघ यासह विविध सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँन्ड सर्व्हिसेस फर्मने पाचोरा नगरपरिषदेस जंतूनाशके पुरविणे व घंटगाड्या दुरुस्ती करणे अशी पुरवठा व सेवेची कामे केलेली आहे. ३ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या १५ लाख ६ हजार ३०० रुपयांपैकी बिलापोटी ६ लाख रुपये नगरपरिषद प्रशासनाने अदा केलेले आहेत. परंतु उर्वरित बिलासाठी गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून वारंवार नगरपरिषद मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना भेटून बिलाची मागणी केली होती. अगोदर ३० टक्क्याप्रमाणे २ लाख ७० हजार रुपये रोखीने लेखाविभागात जमा करा, अन्यथा बिल मिळणार नाही. इतक्या मोठ्या रक्कमेची तरतूद करून दिल्यास संस्थेला मोठे नुकसान होईल. संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने खूप मानसिक ताण सहन करावा लागत आहे. इतर बिले वेळेवर अदा केली जात आहे. पैसे न दिल्यामुळे अडवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधी असतांना अशी अडचण आलेली नाही. परंतु प्रशासक काळात अशा प्रकारे अवाजवी पैश्यांची मागणी होत असल्याने सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँन्ड सर्व्हिसेसचे सुरेश (पप्पु राजपूत) गणसिंग पाटील यांनी पाचोरा उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

यांची होती उपस्थिती

उपोषणस्थळी उबाठा सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, उबाठा शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, जळगाव जागृत मंचचे अध्यक्ष शिवराम पाटील, उबाठा सेनेचे शहर प्रमुख अनिल सावंत, ॲड. अविनाश भालेराव, मा. नगरसेवक नसीर बागवान, सुनील शिंदे, क्षत्रिय गु्रपचे धनराज पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here