आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या निलेश गायकवाडसह त्याच्या आईस त्वरीत अटक करण्याची मागणी

0
2

जळगाव : प्रतिनिधी

येथील गेंदालाल मिल परिसरात राहणार्‍या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, लग्नाचे आमिष दाखवून तसेच खोटी आश्‍वासने देवून दिशाभूल केल्यामुळे तिने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोषी असलेला नराधम निलेश मंगलसिंग गायकवाड व त्याची आई लक्ष्मी मंगलसिंग गायकवाड यांना त्वरीत अटक करुन त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत तरुणीचे काका विनोद रोहीदास जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिडीत तरुणी कु. दिव्या दिलीप जाधव हिने गेल्या २४ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान निलेश गायकवाडच्या मानसिक व असह्य त्रासाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला वेळीच येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने २० दिवस मृत्यूशी झुंज दिली मात्र १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तिची प्राणज्योत मालवली. या घटनेने जाधव परिवाराला जोरदार धक्का बसला असून जोपर्यंत संबंधित नराधम व त्याच्या आईला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही दिव्या जाधवचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

याप्रकरणी विनोद जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर केले असून त्यात संबंधित नराधम निलेश गायकवाड व त्याची आई लक्ष्मीबाई गायकवाड यांना त्वरीत अटक करुन त्यांच्यावर कठोरातकठोर कारवाई करुन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल, अशी तरतुद करावी अशी मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे व सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही श्री.जाधव यांनी केली आहे.

माझा लहान भाऊ दिलीप जाधव व त्याची पत्नी हातमजुरी करुन आपल्या तीन मुलांचा उदरनिर्वाह कसाबसा चालवितात. त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेवून कु.दिव्या हिला निलेश गायकवाड (रा.तारखेडा, ता.पाचोरा) याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व लग्नाचे आमिष दाखविले. गेल्या दोन वर्षापासून तो या संदर्भात हो किंवा नाही हे सुध्दा सांगत नव्हता. समाजातील चार लोक घेवून तारखेडा येथे गेले असतांना निलेश व त्याच्या आईने उडवाउडवीची उत्तरे दिली व उलट तुमच्या मुलीला आवर घाला, असे सांगत अपमानास्पद वागणूक दिली. यावर तुम्ही आमची मुलगी करीत नसाल तर कमीतकमी तुमच्या मुलाला आमच्या मुलीशी संबंध ठेवू देवू नका तसेच संपर्क करु देवू नका, अशी विनंती केली. मात्र दिव्याचे आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेले की निलेश गायकवाड हा तिला वारंवार फोन करीत असे तसेच व्हॉट्सऍपद्वारे चॅटींग करुन मानसिक त्रास देत असे. त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे व त्यास निलेश गायकवाड व त्याची आई लक्ष्मीबाई गायकवाड हे जबाबदार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here