PUC नसलेल्या वाहनांना इंधन बंदी नवा आदेश लागू
साईमत / नवी दिल्ली
राजधानीतील वाढत्या वायू प्रदूषणावर आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने ‘नो PUC, नो फ्युएल’ हा नियम कठोरपणे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र (PUC) नसलेल्या वाहनांना आता कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन देण्यात येणार नाही.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत या नियमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत स्पष्ट निर्देश दिले. मागील वर्षी डिसेंबरमध्ये हा नियम लागू करण्यात आला असला, तरी त्याची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे PUC नसलेली अनेक वाहने अद्याप रस्त्यावर धावत असून प्रदूषणात वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
नव्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंप चालकांना वाहनांचे PUC प्रमाणपत्र तपासणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रमाणपत्र नसल्यास पेट्रोल, डिझेल किंवा CNG देण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग, परिवहन विभाग, महानगरपालिका आणि वाहतूक पोलिस यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई केली जाणार असून वाहन जप्ती तसेच मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन करत वेळेवर PUC प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याचे सांगितले. स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त दिल्लीसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारच्या या निर्णयामुळे राजधानीतील वायू प्रदूषणात घट होण्याची शक्यता व्यक्त होत असून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
