साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे एकाला तांबे विक्रीचे आमिष दाखवून त्याच्याकडून ३० हजार रुपये बळजबरीने हिसकावल्याची घटना घडली. याप्रकरणी कुऱ्हा काकोडा येथील चौघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. काही तासातच चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यातील संशयित आरोपींकडून ५ हजार रुपयाची रक्कम हस्तगत केली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना तात्काळ अटक केल्याने यशस्वी कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
सविस्तर असे की, जम्मू कश्मीर राज्यातील पुलवामा येथील सीदान मोहल्ला रत्नापुरा येथील सईद नूर मोहम्मद अदराबी (वय ४५) यांना कुऱ्हा काकोडा येथील चौघांनी यूट्यूबच्या माध्यमातून तांबे कमी भावात विक्री करण्यासंदर्भात व्हिडिओ टाकला आणि त्या माध्यमातून संपर्क साधत सईद नूर मोहम्मद अदराबी यांनी जम्मू-काश्मीर येथून खंडवा येथे आल्यानंतर मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील शिवारात नेण्यात आले. त्याठिकाणी दिवसभर चौघांच्या संपर्कात व्यक्ती होता.
तांबे कमी भावात देण्यासाठी बोलावून चौघांनी कमरपट्ट्याने मारहाण केली. जम्मू कश्मीर येथील व्यक्तीकडून तीस हजार रुपये रोख बळजबरीने हिसकावून घेतले. त्याला मारहाण करून धमकावून हाकलून दिले. त्यानंतर पीडित व्यक्ती नागपूर-मुंबई महामार्गावर फिरताना आढळला. त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसात येऊन त्याने फिर्याद दिली. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील परमेश्वर भोलाणकर (वय २३), राम उर्फ दिगंबर सोनवणे (वय २०), अमोल घाटे (वय २७), महादेव भोलाणकर (वय २७) अशा चौघांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, पोलीस कॉन्स्टेबल लीलाधर भोई, प्रशांत चौधरी, दिगंबर कोळी, माधव गोरेवार, निलेश श्रीनाथ यांच्या पथकाने आरोपींना पकडून अटक केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू करीत आहेत.