साईमत धुळे प्रतिनिधी
येथील गरीब कुटुंबातील शेतकरी निंबा वामन कोळी यांच्या गायीचा लम्पीच्या आजाराने मृत्यू झाला. घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. डॉ. महेश माळी यांनी तपासणी केली असता लम्पीच्या आजाराने मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले.
गरीब कुटुंबातील निंबा कोळी यांची दोन एकर शेती असून, दुय्यम व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करीत होते. त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता.आधीच पावसाअभावी पिकांची स्थिती जेमतेम असताना दुधाळ गायीचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर संकट कोसळले असून, शासस्तरावरून मदत मिळावी, अशी मागणी निंबा कोळी यांनी केली आहे. दरम्यान, गावात लम्पीच्या आजाराने मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली असून, भीती निर्माण झाली आहे. लम्पीचे लसीकरण झाले असूनही आजार डोके वर काढत आहे.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे. दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी लम्पीच्या आजाराने मृत्यू झाल्यास शासस्तरावरून मदत मिळत असून, आपण मृत्यूची नोंद करत शासनस्तरावर कळविणार असल्याचे सांगितले. तालुक्यात लम्पीचे लसीकरण झालेले आहे, तरीही गावात व गोठ्यात ग्रामपंचायतीतर्फे फवारणी करण्यात यावी व शेतकरी वर्गाने सर्व गुरे एकत्रित येतील असे सण साजरे करू नयेत.लम्पीसदृश लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्यात तशी नोंद करावी व शेतकरी वर्गाने जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्यांनी लम्पीविषयी तालुका वैद्यकीय अधिकारी संकेत पुपलवाड यांना फोनवर सांगितले, मात्र निमगूळ येथे त्यांनी भेट न दिल्याने व परिस्थिती न जाणून घेतल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली.