एका घरातील एक बहिणीला एक साडी गिफ्ट घरपोच देण्यात येणार
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी:
भडगाव तालुक्यातील मतदार संघातील सर्व बहिणींना रक्षाबंधनानिमित्त आ.किशोर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मतदारसंघातील पाचोरा आणि भडगाव शहरासह ग्रामीण भागातील एका घरातील एक बहिणीला एक साडी गिफ्ट घरपोच देण्यात येणार असल्याचे आ.किशोर पाटील यांनी शुभेच्छा देतांना सांगितले.
विधानसभा पार पडेपर्यंत उमेदवारांची होणार दमछाक तर मतदारांची ‘बल्लेबल्ले’
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने जनहिताच्या योजना अंमलात आणून त्याचा लाभ जनतेला दिला जात आहे. पाचोरा – भडगाव मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान आ. किशोर पाटील, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, उबाठा शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी आणि संभाव्य अपक्षासाठी तयारी करत असलेले विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्यावतीने मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी रस्सीखेच आणि राजकीय स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे.
महाराष्ट्र राज्याची निवडणूक प्रक्रिया लांबल्याने विद्यमान, माजी आणि संभाव्य आमदारकीच्या उमेदवारांची मतदारांना खुश ठेवण्यासाठी या कालावधीत येणाऱ्या सणांच्यानिमित्त विविध स्तरांवर भेटवस्तू, धार्मिक उपक्रम राबविण्याकरीता वारेमाप खर्च होणार आहे. आपल्या बाजूने वळविण्यासाठी निवडणूक मतदान पार पडेपर्यंत विधानसभा लढविण्याकरिता निवडणुकीच्या आखाड्यात उतरणाऱ्या सर्वांची दमछाक होणार आहे, हे निश्चित. आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या स्पर्धेत मतदारसंघांतील मतदारांची मात्र ‘बल्लेबल्ले’ होणार आहे.