साईमत, धुळे, प्रतिनिधी
नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील धुळे शहरात बेवारस, मरणासन्नावस्थेत आढळले.त्यांना स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी हिरे मेडिकल कॉलेजच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. श्री. चव्हाण यांना संबंधित रुग्ण कोण हे माहीत नव्हते. त्यांनी रुग्णाच्या आधारकार्डव्दाद्वारे सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केल्यावर ओळख पटू शकली.
स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख चव्हाण बेवारस व्यक्तींच्या मदतीसाठी धडपडत असतात. त्यांना शहरातील सुरत बायपासजवळ अजळकरनगरात गुरुवारी एक व्यक्ती निपचित पडून असल्याची माहिती मिळाली. सायंकाळनंतर त्या व्यक्तीला श्री. चव्हाण व गणेश ढापसे यांनी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
नंतर वॉर्ड क्रमांक ३५ मध्ये संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू झाले. खिशात आढळलेल्या आधारकार्डच्या आधारे त्या व्यक्तीचे नाव रवींद्र बाबुराव पाटील (रा. वेळोदे, ता. चोपडा) असल्याचे समोर आले. या व्यक्तीशी संबंधितांनी संपर्क साधावा, यासाठी श्री.चव्हाण यांनी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले.
रवींद्र पाटील यांच्या भावजय शोभा आनंद नेरपगार (पाटील) ह्या त्यांच्या मुलीसह जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्या नाशिकला वास्तव्यास आहेत. गेल्या काही वर्षांपासून वेळोदे येथे रवींद्र पाटील आणि त्यांचे वडील म्हणजेच शोभाबाईंचे सासरे दोघेच राहत होते. त्यांना शोभाबाई किराणा देत होत्या. गेल्या वर्षी शोभाबाई यांचे सासरे वारले. त्यामुळे रवींद्र पाटील यांची आबाळ होऊ नये म्हणून कर्तव्यभावनेतून शोभाबाई किराणा देतच होत्या. श्री.पाटील हे नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील असल्याच्या वृत्ताला शोभाबाई आणि जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनानेही दुजोरा दिला.
अशी पटली ओळख
रवींद्र पाटील यांची पत्नी आणि मुलगी गौतमी गेल्या १५ वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत. रवींद्र पाटील यांच्यापासून १५ वर्षांपूर्वी गौतमी आणि तिची आई विभक्त झाले. नंतर गौतमी शिंदखेड्यात मामांकडे वाढली. आठवीपर्यंतच्या शिक्षणानंतर तिने पुणे गाठले. तेव्हापासून तिचा नृत्यप्रवास सुरू झाला. रवींद्र पाटील यांची मुलगी गौतमी पाटील असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनाही नव्हती. मात्र, सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केल्यानंतर त्यांना दीडशेवर फोन आले. गौतमीची मावशी धुळ्यात येणार असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले. गौतमीशी आमचा काहीही संबंध नाही, अशी माहिती रुग्णालयात उपस्थित नातेवाइकांनी दिली. रवींद्र पाटील यांची प्रकृती गंभीर आहे.