साईमत जामनेर प्रतिनिधी
चिंचखेडे बुद्रुक येथील शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, देशभक्तीपर आणि ऐतिहासिक नाटिकांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
इतिहास आणि देशभक्तीचा संगम
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पाळणा, शिवरायांच्या इतिहासातील प्रसंग आणि छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी राजांचा तसेच कवी कलश यांच्या बलिदानाचे प्रसंग हुबेहूब साकारले.
विविध नृत्य आणि सादरीकरण
कार्यक्रमात कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, मराठी शाळा गीत, भारतीय सीमेवरील युद्धाचे दृश्य आणि विविध गाण्यावर नृत्याविष्कार सादर करण्यात आले. यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
प्रोत्साहन आणि बक्षीसे
उपस्थितांनी विद्यार्थ्यांना भरघोस बक्षीसे देऊन प्रोत्साहन केले आणि टाळ्यांच्या कडकडाटाने उत्स्फूर्त दाद दिली.
प्रमुख मान्यवर उपस्थित
कार्यक्रमात जामनेरचे उपनगराध्यक्ष डा. प्रशांत भोंडे, गटनेते अमर पाटील, माजी सभापती शेखर काळे, देवपिंपरीचे सरपंच तुकाराम निकम, पोलीस पाटील राहुल पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय पाटील, केंद्रप्रमुख सुरेश अंभोरे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भिका लोहार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि यशस्वीतेसाठी मेहनत
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता पाटील व दीपक ढोणी यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक देवाजी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय पाटील, किशोर डकले, निलेश पाटील, पुनम डकले, सुजाता सुरवाडे यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या उत्साहाने उपस्थितांना भारावून टाकले आणि शालेय संस्कृतीत इतिहास, देशभक्ती आणि नृत्याचा अनोखा संगम साकारला.
