दीपनगरच्या सीएसआर निधीसाठी वरणगावकरांचेही आंदोलन, दोन कोटी रुपयांची मागणी
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :
दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेच्या प्रदूषणामुळे भुसावळ व रावेर तालुक्यातील किमान १९ गावे बाधीत झाली असुन याचा परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मात्र, अशा बाधीत गावांना दिपनगरच्या माध्यमातून दिला जाणाऱ्या सीएसआर निधीत दुजाभाव होत असल्याच्या कारणावरून परिसरातील त्रस्त ग्रामस्थांनी दिपनगरच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले . तर या आंदोलनाला आ . एकनाथराव खडसे यांनी पाठींबा दर्शवित अधिकाऱ्यांना तुम्ही निविदा कुणाच्या सांगण्यावरून रद्द केली असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आ. संजय सावकारे व आ. एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच सीएसआरचा निधी वरणगावलाही मिळावा, यासाठी दीपनगर येथे वरणगावकरांनी आंदोलन केले. यामध्ये दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.
दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील कोळशाची राख पाईपलाईनद्वारे किमान आठ कि.मी. अंतरावरील वेल्हाळे नजिकच्या राखेच्या बंडात टाकली जाते. मात्र, ही राख वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असते. त्यामुळे ही राख उन्हाळ्यातील हवेने तसेच पावसाच्या पाण्याने वाहून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच वीज निर्मिती प्रकल्पाच्या धुराच्या चिमणीतून निघणाऱ्या राखेचे कणामुळे परिसरातील शेत शिवारातील शेती पिकांना तसेच या वायु प्रदुषणाचा फटका ग्रामस्थांना बसत आहे .
यासाठी विजनिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून बाधीत गावांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे तसेच गावाच्या विविध विकासासाठी सीएसआर फंडातून विशेष निधीची तरतूद करून बाधीत गावांना विकास कामांसाठी दिला जातो. मात्र, सीएसआर फंडातून दिल्या जाणाऱ्या निधीत दीपनगर प्रशासनाच्या माध्यमातून दुजाभाव होत असल्याच्या कारणावरून राखेच्या प्रदुषणामुळे सर्वांत जास्त बाधीत असलेल्या वेल्हाळे, जाडगाव, मन्यारखेडे, फुलगाव, पिंप्रीसेकम अशा काही गावातील सरपंच व ग्रामस्थांनी दिपनगर प्रशासनासोबत पत्र देवून चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी बैठकीला नकार दिल्याने संतप्त सरपंच व ग्रामस्थांनी दीपनगरच्या प्रवेशद्वाराजवळच आंदोलन सुरू केले.
त्याची माहिती मिळताच आ . एकनाथराव खडसे यांनी आंदोलनस्थळी भेट देवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित सीएसआर निधीची निविदा तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून रद्द केली, असा प्रश्न उपस्थित अधिकाऱ्यांना विचारत चांगलेच धारेवर धरले . यावेळी प्रत्यक्षपणे आ . संजय सावकारे यांनी निविदा रद्द केल्याने हा घोळ निर्माण झाल्याचे सांगितले. यामुळे दोन्ही आमदार व त्यांच्या समर्थकांकडून प्रसार माध्यमांवर आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडु लागल्या आहेत. वीज निर्मिती प्रकल्पातील प्रदुषणाच्या झळा वरणगावकरांनाही सोसाव्या लागत अाहे. सीएसआर निधीत वरणगाव शहराचाही समावेश करण्यात यावा, यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, त्यांच्या सहकाऱ्यांनी दीपनगर येथे आंदोलन करून मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले.
आ. सावकारे यांचीही पत्रकार परिषद
माजी मंत्री व आ. एकनाथराव खडसे यांनी आ . संजय सावकारे यांनी मागील निवीदा रद्द करून नवीन निविदा काढल्यामुळे सीएसआर निधीत दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे आ. संजय सावकारे यांनीही तातडीने समर्थकांसह पत्रकार परिषद घेऊन निविदा ही नियमानुसार आहे. आ . खडसे यांनी कुणाचेही ऐकुन न घेता आधी शहानिशा करावी, असा सल्ला दिला. तसेच यासंदर्भात आम्हीही आंदोलन करू, असे सांगितल्याने दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी प्रसार माध्यमांवर एकमेकांविरुद्ध आरोप – प्रत्यारोप सुरू केल्याने सीएसआर निधीबाबत चांगलाच ‘कलगी तुरा’ रंगला आहे.
वरणगावकरांचेही निधीसाठी आंदोलन
दीपनगर प्रशासनाच्या माध्यमातून लगतच्या बाधीत गावांना सीएसआर फंडातून ज्या प्रमाणे निधी दिला जातो . त्याच प्रमाणे हा निधी वरणगांवला सुद्धा मिळावा यासाठी २५ रोजी सकाळी १२ वाजता माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली दीपनगरच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले . यावेळी माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कदीर खाँ पठाण, शामराव धनगर, मिलींद भैसे, नाना चौधरी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता सुशांत चव्हाण, संतोष वखारे, स्थापत्य विभागाचे अभियंता मोहन तायडे यांना निवेदन देवून दोन कोटी रुपयांची मागणी केली. यावेळी सुरक्षा अधिकारी पी. एम. रामटेके, जळगावचे पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
राखेचे ठिय्ये कुणाचे? शेतकऱ्यांचा संताप
वीज निर्मिती प्रकल्पातील राख वेल्हाळे लगतच्या बंडात टाकली जाते. राखेचा उपयोग विट निर्मिती तसेच महामार्गाच्या भरावासाठी केला जात असल्याने वेल्हाळे व परिसरातून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर तसेच डंपरद्वारे रात्रंदिवस राखेची वाहतुक केली जाते. परिणामी या भागातील डांबरी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांच्याच जवळच्या पदाधिकाऱ्यांचे वेल्हाळे परिसरातील शेती भाडे तत्वावर घेवून त्याठिकाणी राखेच्या साठवणुकीचे ठिय्ये निर्माण केले आहेत. त्यामुळे ठिय्यांवरील राखेचाही मोठ्या प्रमाणावर शेती पिकांवर प्रादुर्भाव निर्माण झाला आहे.
या परिसरातील वृक्ष तोड करण्यात आली असल्याने हा परिसर दिवसेंदिवस बोडका होत आहे. त्यामुळे राखेचे साठवणूक ठिय्ये बंद करण्यात यावे, अशी संतप्त मागणी त्रस्त झालेले शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा राखेच्या गोरखधंद्याच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे.