साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील हॉटेल दयानंद जवळील मुख्य पूल गेल्या दीड महिन्यांपासून पाडण्यात सुरुवात झाली आहे. याठिकाणी नव्याने पूल उभारणी सुरू असल्याने घाट रोड परिसरातील अनेक ठिकाणच्या नागरिकांना यामुळे गैरसोय होत आहे. चौधरी वाडा, पावर हाऊस, सुवर्णाताई नगर, गोपाळ पुरा भागातील नागरिकांना त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुलाच्या नूतनीकरणासाठी अजून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांनी स्वखर्चातून नदीतून पर्यायी रस्त्याची उभारणी केली आहे.
गोपाळपुरा चौधरी वाड्यापासून अमरधामपर्यंत नदीतून कच्चा रस्ता टाकल्याने नदी पलीकडील नागरिकांचा मोठा फेरा वाचला आहे. पुलाचे नूतनीकरण सुरू असल्याने वाहनधारकांना तसेच परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. परंतु पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी असल्याने येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
आता माजी नगरसेवक व त्यांच्या मित्र परिवाराने नदीतून तात्पुरता रस्ता बनवून दिल्याने नदी पलीकडील हजारो नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामासाठी तेली समाजाचे अध्यक्ष दिलीप चौधरी, नगरसेवक रामचंद्र जाधव, बापू अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.