बोदवड : प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीतून बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी संविधान बचाव भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. संविधान प्रेमी जनतेच्यावतीने मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला कृषी उत्पन्न बाजार समिती येथुन सुरूवात झाली. डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याजवळ वंदन करून शेकडो भीम अनुयायींनी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. संविधान विरोधी वक्तव्य करणारे विवेक देबोटोरोय यांना कठोर शासन व्हावे, या मागणीचे पत्र तहसील कार्यालय येथे देण्यात आले.
यावेळी संविधान बदलविण्याची भाषा करणारे सत्ताधारी पक्षाचे मंत्री यांचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच संविधान प्रेमींनी भाजप सरकारवर निशाणा साधत संविधान बदलण्याची भाषा जर करत असाल तर आज फक्त बौद्ध बांधवच रस्त्यावर उतरले आहेत. जर असेच संविधानाला हात लावायचा प्रयत्न सुरु राहील तर सर्व बहुजन समाज, ओबीसी समाज, अठरा पगड जातीच्या जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून मोर्चे काढण्यात येतील, त्याची शासनाने दखल घ्यावी, अशा घोषणा दिल्याने तहसील कार्यालय दणाणले होते.