रोटरी जळगावच्या संवाद सत्रातील महिलांचा सूर
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
सातत्य, सकारात्मक विचार व सजगता हेच निरोगी जीवनाचे गमक आहे, असे रोटरी क्लब जळगावच्या निरोगी जीवन व सवयी विषयावरील संवादातील सहभागी महिला सदस्यांनी केले. रोटरीच्या रोग प्रतिबंध व उपचार महिन्यांतर्गत महिला समितीच्यावतीने आयोजित विशेष सभेत त्या बोलत होत्या. त्यात रोटरी परिवारातील सदस्य माजी अध्यक्ष डॉ. सुमन लोढा, सेवानिवृत्त उपप्राचार्य पूनम मानुधने, स्वाती ढाके यांनी सहभाग नोंदवला.
संवादाचे संचालन पहिली महिला आदिती कुळकर्णी यांनी केले. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर यांची उपस्थिती होती. तीनही मान्यवर सदस्यांनी आपापल्या जीवनप्रवासातून एकच गोष्ट ठामपणे सांगितली की, निरोगी जीवनासाठी आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. त्यासाठी कौटुंबिक जबाबदारी पार पाडतांना परिवार सदस्यांचे सहकार्य घ्यावे. वेळेचे नियोजन करुन स्वतःसाठी किमान तास दिड तास वेळ काढावा. चांगल्या मित्रांचा सहवास मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. सर्वांनी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे.
योगा, प्राणायामाने बाह्य सौंदर्यासोबत अंतर्गत सौंदर्य खुलते. शरीरात निर्माण झालेल्या कॅलरी श्रमाने वापरल्या जाव्यात. महिला बहुतेकदा ॲनिमिक असतात. त्यांनी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज प्रतिपादित केली. आहारात सर्व प्रकारच्या स्वादाचा समावेश असावा. मात्र, ते प्रमाणात असावे. नियमित व्यायाम व सूर्यनमस्काराने लाभ होतो, असेही त्यांनी सांगितले.
निरोगी जीवनासाठीच संकल्प उतरवण्याचे आवाहन
आजार झाल्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आजार होऊच नयेत, यासाठी जीवनशैलीत बदल करणे हेच सर्वांचे सांगणे होते. आपल्या दैनंदिन जीवनात निरोगी जीवनासाठीच संकल्प उतरवण्याचे त्यांनी आवाहन केले. सभेस मोठ्या संख्येने रोटरी परिवारातील सदस्य उपस्थित होते. शेवटी डॉ. शुभदा कुळकर्णी यांनी आभार मानले.
