साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर
दिवसेंदिवस वाढणारे तापमान, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि त्यामुळे मानवी जीवणावर होणारे दुष्परिणाम हा जनतेसाठी नवीन विषय राहिलेला नाही. पर्यावरण वाचवायचे असेल तर प्रत्येकाने किमान दोन झाडे जगविली पाहिजेत. झाडे जगविण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. कारण आत्ताच तापमान ४५ च्या पुढे गेले आहे. त्यामुळे उष्माघाताने कित्येक प्राण्यांना व पक्षांना जीव गमवावा लागला आहे. येत्या पाच वर्षात ते ५०च्या आसपास पोहचेल. तेव्हा मात्र आहेत ती झाडेही जळून जातील, मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होईल, पाण्याचे स्त्रोत आटून जातील. अशा परिस्थितीत नवीन झाडे लावणेही शक्य होणार नाही. म्हणून येणाऱ्या पावसाळ्यात किमान आपल्या भावी पिढीसाठी तरी वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन व्हावे, असे आवाहन चोपडाचे वनक्षेत्रपाल बी.के.थोरात यांनी केले.
येथुन जवळील चौगाव येथे वन विभागाच्यावतीने यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक उपवनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनक्षेत्रपाल बी.के थोरात यांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
चौगाव येथील कक्ष क्र.२५९ मध्ये नीम या पर्यावरण पूरक झाडांची लावणी चौगाव येथील सरपंच कल्पना पारधी यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी वनपाल जयप्रकाश सूर्यवंशी, चौगाव वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्राम तेले, वनसंरक्षक सरला भोई, अमोल पाटील, शुभम पाटील, राहुल पाटील, रावसाहेब कोळी, संजय पाटील, गोकुळ पारधी आदी उपस्थित होते.