यावल-भुसावळ रस्त्याचे काँक्रिटीकरणासह गटारीचे काम निकृष्ट

0
2

साईमत, यावल : प्रतिनिधी

शहरापासून यावल-भुसावळ रस्त्याचे काँक्रिटीकरणासह रस्त्याच्या बाजूला गटारीचे बांधकाम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस यावलचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे सोमवारी, १६ ऑक्टोबर २०२३ रोजी केली आहे.

यावल येथील अत्यंत वर्दळीच्या रहदारीच्या मार्गावरील भुसावळ नाक्यापासून सुरू असलेल्या व गटारींच्या कामांमध्ये स्थानिक नद्या, नाल्यामधील माती मिश्रित वाळू वापरली जात आहे. तसेच बांधकामामध्ये मंजूर प्लॅन, इस्टिमेट, निविदामधील अटीशर्तीप्रमाणे उत्कृष्ट दर्जाचे, प्रमाणाचे बांधकाम साहित्य वापरले जात नसल्याने रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. जळगाव जिल्ह्यासह विविध राज्यातील अवजड वाहने यावल-भुसावळ रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. अशा प्रकारे गुणवत्ता नसलेला रस्ता तयार झाल्यास तो फार काळ टिकणार नाही. तसेच सिमेंट काँक्रीटकरणाचे काम संथगतीने सुरु आहे. वाहतुकीसाठी रस्त्याच्या बाजूने ठेकेदाराने आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता यांनी रस्त्याच्या बाजूला वाहतुकीसाठी पर्यायी पाहिजे. त्या प्रमाणात व्यवस्थित रस्ता न केल्याने तसेच कामाच्या ठिकाणी एकेरी वाहतूक होण्यासाठी लाल झेंडे दाखविणारे मजूर व्यक्ती व्यवस्थित आणि ठराविक अंतरावर न ठेवल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

चौकशी करुन त्वरित कारवाई करा

भुसावळकडे जाणाऱ्या आणि भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या वाहनांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अन्यथा न्यायालयात न्याय मागावा लागेल, असे प्रा.मुकेश येवले यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यांनी माहितीस्तव तक्रार महाराष्ट्र राज्य सा.बां. विभागाचे मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक, जळगाव यांच्याकडे पाठविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here