लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाची तयारी पूर्ण करुन ठेवा

0
31

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणूक संदर्भातील सर्व अनुषंगिक कामकाजाची तयारी आतापासूनच पूर्ण करुन ठेवण्यात यावी. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील मतदान केंद्रासाठी किमान मुलभुत सुविधांचा आढावा घेऊन आवश्‍यक त्या उपाययोजना पूर्ण करुन घ्याव्यात. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मतदार केंद्राची तपासणी पूर्ण करुन अपूर्ण कामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश जळगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक निर्णय ४ रावेर लोकसभा मतदार अधिकारी तथा जळगाव अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १० – चोपडा लोकसभा मतदार संघातील सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व लोकसभा निवडणूककामी नेमणूक केलेल्या सर्व नोडल अधिकारी व सहाय्यक नोडल अधिकाऱ्यांची नुकतीच चोपडा येथील प्रशासकीय इमारत तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. आढावा बैठकीत चोपड्याच्या तहसिलदारांनी प्रथम चोपडा मतदार संघाची प्राथमिक माहितीचे वाचन केले.

बैठकीत जळगावच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुख व नोडल अधिकाऱ्यांनी सोपविण्यात आलेल्या विषयाबाबत माहिती पुस्तिकेचे वाचन करण्यात यावे. तसे सखोल नियोजन करण्यात यावे. ईव्हीएमची संपूर्ण माहिती घेवून जास्तीत जास्त ईव्हीएम मशिन हाताळून सखोल ज्ञान प्राप्त करुन घ्यावे. निवडणूककामी सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाचे नियोजन करावे. ठिकाण, वेळ याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. मतदान केंद्र दुरुस्ती प्रस्ताव मंजूर आहे. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, याबाबत गटविकास अधिकारी व संबंधित उपअभियंता (सा.बां.) यांनी दक्षता घ्यावी. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या नियम पुस्तिकेनुसार आपआपले काम समजावून घेऊन कामकाज करण्याबाबत सूचना दिल्या.

बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन गजेंद्र पाटोळे, अर्पित चव्हाण भा.प्र.से. परिविक्षाधिन मुख्याधिकारी नगरपरिषद चोपडा, चोपडा तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी रमेश वाघ, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे तसेच सर्व विभाग प्रमुख, नोडल अधिकारी सहाय्यक नोडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here