साईमत चोपडा प्रतिनिधी
चोपडा न्यायालयात १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 1,251 प्रकरणांवर निकाल देण्यात आला असून, एकूण 77 लाख 92 हजार 207 रुपये वसूल करण्यात आले. या अदालतीत दिवाणी तसेच फौजदारी प्रलंबित प्रकरणांचा यशस्वीरीत्या निपटारा झाला.
सकाळी 10.30 वाजता सुरू झालेल्या या अदालतीत पॅनलवर दिवाणी न्यायाधीश श्री. एस. डब्ल्यू. शेगोकार हे प्रमुख होते. त्यांच्या सह पंच म्हणून ॲड. व्ही. बी. पाटील आणि चोपडा वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. तसेच, सरकारी अभियोक्ता नितीन माळी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, व चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनीही उपस्थित राहून अदालती कार्यप्रणाली सुरळीत चालवली.
या राष्ट्रीय लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी प्रलंबित 531 प्रकरणांपैकी 113 प्रकरणांवर निकाल देण्यात आला. त्यात फौजदारीचे 68 प्रकरणे, धनादेश अनादर 19 प्रकरणे, पती-पत्नीचे कौटुंबिक वाद 3 प्रकरणे आणि दिवाणी 23 प्रकरणे यांचा समावेश होता. या निकालांतून 32 लाख 62 हजार 279 रुपये वसूल करण्यात आले, तसेच दोन कौटुंबिक प्रकरणांत संसाराचा मनोमिलन साधण्यात आला.
याचबरोबर, बँक, मराविम मंडळ, ग्रामपंचायती, तहसील कार्यालय आणि बी.एस.एन.एल. यांचे दाखलपूर्व 6,217 प्रकरणांपैकी 1,138 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यांतून 45 लाख 29 हजार 928 रुपये वसूल झाले. परिणामी, एकूण वसुली 77 लाख 92 हजार 207 रुपयांची झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बार असोसिएशनचे वकील सदस्य, पोलीस कर्मचारी, सहाय्यक अधीक्षक, न्यायालयीन कर्मचारी, बँकेचे शाखा अधिकारी, मराविम मंडळ व बी.एस.एन.एल. अधिकारी यांनी सहकार्य केले. पॅनल प्रमुख न्यायाधीशांनी सर्वांचे आभार मानले आणि प्रकरणांचा त्वरित निपटारा झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या राष्ट्रीय लोक अदालतीमुळे चोपडा परिसरातील प्रकरणांची लांबणी थांबली असून, नागरिकांमध्ये न्यायव्यवस्थेबाबत विश्वास वाढेल अशी अपेक्षा आहे.
