नसरापूर अत्याचारप्रकरणी शिवसेना महिला आघाडी आक्रमक; प्रशासनाला निवेदन सादर
साईमत/पाचोरा / प्रतिनिधी :
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला तात्काळ भरचौकात फाशीची शिक्षा द्यावी, अशी तीव्र मागणी पाचोरा येथील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, समाजात अशा नराधमांना कोणतीही जागा नसल्याची संतप्त भावना महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने बुधवार, ७ मे रोजी पाचोरा येथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांची भेट घेऊन संबंधित मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
निवेदनात या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. पीडित चिमुकलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
निवेदन देताना शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख ललिता पाटील, उपजिल्हाप्रमुख वंदना पाटील, मंदा पाटील, उपजिल्हा समन्वयक बेबा पाटील, सुनंदा महाजन, उपजिल्हा संघटक सुष्मा पाटील, तालुका संघटक प्रिती सोनवणे, शहर प्रमुख मंदाकीनी पारोचे, अनिता पाटील, नगरसेविका वर्षा ब्राम्हणे, मनिषा बाविस्कर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
या अमानवीय घटनेमुळे महिला वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोर शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनीही या आंदोलनाला व मागणीला आपला पूर्ण पाठिंबा दर्शविल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवले असून पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईच्या सूचना दिल्याचा दावा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
