छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते-संभाजी भिडे
मुंबई (प्रतिनिधी)-
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असे मत व्यक्त केले आहे . काहीजण आपल्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी भिडे म्हणाले की,”छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्मीय नव्हते. काही लोकांनी हे चिकटवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदु धर्माच्या रक्षणासाठीच होते. इतिहासाचा अभ्यास असलेले आणि छत्रपती शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करुन घेण्याची हाव असलेले सगळे भाडोत्री आहेत. त्यांच्याकडून हा गलबला निर्माण झाला आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, शहाजी राजे स्वतः मला हिंदवी राज्य स्थापन करायचे आहे असं बोलले आहेत. याचे पुस्तकात पुरावे आहेत. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. पण सगळ्या समाजातील लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्यासाठी कसा होईल ते बघतात,” असेही संभाजी भिडे म्हणाले.
संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात, निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे ,याचे द्योतक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथंच पाहिजे”, असे म्हणत संभाजी भिडे यांनी रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला समर्थन दिले.