नागरिकांना एकाच छताखाली मिळाल्या १५ पेक्षा अधिक महसुली सेवा
साईमत जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग तसेच तहसील कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत पिंप्राळा येथे आज, १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भवानी स्वीट मार्ट शेजारील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.
नागरिकांना त्यांच्या दैनंदिन महसुली कामकाजासाठी विविध कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत तसेच एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘एक खिडकी योजना’ अंतर्गत तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी एकाच छताखाली उपस्थित राहिल्यामुळे नागरिकांची कामे अत्यंत जलदगतीने आणि सुलभ पद्धतीने पूर्ण करण्यात आली.
शिबिरात नागरिकांना तब्बल १५ पेक्षा अधिक महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये क्यूआर कोडयुक्त डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे त्वरित वितरण, विविध प्रमाणपत्रांचे वाटप तसेच उत्पन्न, जात, रहिवासी आणि नॉन-क्रीमीलेअर दाखले यांचा समावेश होता. तसेच प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणांवर कार्यवाही, अभिलेख दुरुस्ती आणि डिजिटल ७/१२ च्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती करण्यात आली.
याशिवाय अकृषिक (NA) रूपांतरणाच्या नवीन नियमांबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुरी, घरकुलांसाठी पट्टे वाटप तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी प्रक्रियाही यावेळी पूर्ण करण्यात आली.
हे शिबीर जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (भा.प्र.से.), अप्पर जिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हारकर, उपविभागीय अधिकारी श्री. विनय गोसावी आणि तहसीलदार श्रीमती शितल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले.
या शिबिरादरम्यान संजय गांधी योजना तहसीलदार श्रीमती रुपाली काळे, नायब तहसीलदार श्रीमती प्राजक्ता केदार, नायब तहसीलदार श्री. डी. बी. जाधव, कुळ कायदा अव्वल कारकून श्रीमती गीता शिंदे, मंडळ अधिकारी श्री. मिलिंद देवरे तसेच पिंप्राळा, निमखेडी आणि मोहाडी येथील ग्राम महसूल अधिकारी अनुक्रमे श्री. राजू बारे, श्री. प्रमोद इंगळे आणि श्री. कपिल मेसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुंदर आणि प्रभावी सूत्रसंचालन मोनाली लांगरे यांनी केले. यासोबतच तहसील कार्यालयातील विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता पारदर्शक, जलद आणि विनम्र सेवा देणे हे महसूल प्रशासनाचे प्रमुख ध्येय आहे,” असा ठाम संदेश या शिबिराच्या माध्यमातून देण्यात आला.
