आरोग्य, शिक्षण व ग्रामविकास विभागांचा सखोल आढावा; त्रुटींवर तातडीच्या सुधारणा आदेश
साईमत /जळगाव /कानळदा/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी जळगाव तालुक्यातील कानळदा गावाला अचानक भेट देत शासकीय यंत्रणेचा सखोल आढावा घेतला. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या धडक पाहणीमुळे स्थानिक प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून विविध विभागांची प्रत्यक्ष कामकाज तपासणी करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, संस्था आणि विभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेण्याचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी कानळदा येथे अचानक भेट देत आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकास विभागांच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
आरोग्य केंद्रात कडक तपासणी
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणीदरम्यान त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सेवा, औषधसाठा, स्वच्छता व्यवस्था तसेच कर्मचाऱ्यांची उपस्थिती याची सखोल तपासणी केली. आरोग्य सेवांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश देत नागरिकांना दर्जेदार व वेळेवर सेवा मिळणे ही प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. आढळलेल्या त्रुटींवर तातडीने सुधारणा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
शाळा व अंगणवाडीत विद्यार्थ्यांशी संवाद
यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पोषण आहार आणि शैक्षणिक साहित्याची उपलब्धता याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. मुलांना सुरक्षित, प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
ग्रामपंचायत कार्यालयात विकासकामांचा आढावा
ग्रामपंचायत कार्यालयाच्या भेटीदरम्यान त्यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून विविध विकासकामांचा आढावा घेतला. कार्यालयातील दप्तर, अभिलेख आणि प्रशासकीय नोंदींची तपासणी करत ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामकाजात गती, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढविण्याचेही स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
सीईओंच्या या अचानक दौऱ्यामुळे स्थानिक प्रशासन यंत्रणा अधिक सतर्क झाली असून पुढील काळात कामकाजात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
