साईमत / नाशिक
भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात गुन्हेगारीच्या घटनांवर चर्चा सुरू असताना, नाशिकमधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि मानसिक छळ होत असल्याचे संतापजनक प्रकार उघड झाले आहेत.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल झाले असून, ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यांची तपशीलवार विभागणी अशी आहे: बलात्कार – १, विनयभंग – ४, विनयभंग व धार्मिक भावना दुखावणे – ३, धार्मिक भावना दुखावणे – १ या प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. तपास सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. एसआयटीने सर्व खासगी कंपन्यांना महिलांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
पीडित महिलांसाठी पोलिसांनी हेल्पलाइन ९१२३२३२३११ जारी केली आहे. तसेच, कंट्रोल रूम ११२ वरही संपर्क करता येईल. एसआयटीने तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे सांगितले आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण उघडकीस आल्याने समाजात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस तपास अजून सुरू असून, प्रकरणाचा पुढील खुलासा येत्या दिवसांत होण्याची शक्यता आहे.
