9 Serious, 12 Injured : दलवाडे प्र.न.फाट्याजवळ बस-आयशर ट्रकचा अपघात ; ९ गंभीर, १२ जखमी

0
12

ओव्हरटेक करण्याचा नाद भोवला

साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी :

शिंदखेडा-विरदेल रस्त्यावरील दलवाडे प्र.न.फाट्याजवळ जळगाव-नंदुरबार बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक होऊन बसमधील ९ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना धुळे येथे पाठविण्यात आले आहे तर बसमधील इतर १२ जखमींना शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात ओव्हरटेक करण्याच्या नादात झाला आहे. घटनास्थळी बिट हवालदार गणेश सोनवणे दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. दोन्ही वाहनवरील चालकांना धुळे येथे उपचारासाठी रवाना केले आहे.

जळगाव येथून नंदुरबारकडे जात असलेली नंदुरबार आगाराची एसटी बस (क्र.एमएच २० बीएल ४०२५) आणि ट्रक (क्र.एमएच १८ बीझेड ६६१८)यांच्यात दलवाडे फाट्याजवळ समोरासमोर धडक दिल्याने मोठा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. १९ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नंदुरबारकडे जात असलेली एसटी बस दलवाडे फाट्याजवळ समोर निळ्या रंगाचे ट्रॅक्टर चालत असल्याने त्याला ओव्हरटेक करत होती. परंतु समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. अपघातात बसच्या पुढील भागाचा चुराडा झाला आहे. सुदैवाने, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ९ प्रवाशी गंभीर तर इतर प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी असल्याचे चालकाने सांगितले.

अपघातातील गंभीर ९ जखमींमध्ये धुडकू राजाराम भील (वय ६५), बस चालक सुभाष सोपानराव पासकरे (४०) देवचंद गंगाराम ठाकूर (६६), मीना राजेंद्र शिवदे (३०), दिलीप अमर नगराळे (७०), संजू भिका तमखाने (५०), दशरथ वडार (६०), ट्रक चालक बाबुराव धुडकू पाटील यांचा समावेश आहे. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे पाठविण्यात आले आहे. तसेच इतर जखमींमध्ये सुरेखा भरतसिंग गिरासे (वय ४७), बस वाहक माधुरी प्रशांत चांदेकर (३४), सुमनबाई सुका पाटील (७०), गंगाबाई चंद्रसिंग गिरासे (८१), सखुबाई दशरथ वडर (५०), हिरामण उघडू भील (५३), राहुल अर्जुन भील (०२), सायाबाई अर्जुन भील (२५), गौरी राजेंद्र शिवदे (१३), खटाबाई पाटील (६८), ललित राजेंद्र शिवदे (११) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ.भूषण काटे, परिचारिका मनीषा पावरा, पूनम ताडू, विजया शिरसाठ, दत्तात्रय निळे, सुनीता राजभोस, कुंडलिक वानूळे, रवी तायडे आदींनी उपचार सुरू केले.

वाढत्या अपघाताच्या प्रमाणामुळे वाढली चिंता

यावेळी बस चालक सुभाष सोपानराव पासकरे, वाहक म्हणून माधुरी प्रशांत चांदेकर कर्तव्यावर होते. ट्रक चालक बाबुराव पाटील होते. ट्रक मालक पारोळा येथील आहे. हा ट्रक गुजरातकडून येत होता. ट्रकमध्ये जिरे भरलेले होते. महामार्गावरील वाढत्या अपघाताच्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जळगाव-नंदुरबार बसमधील प्रवाश्यांना पर्यायी बस व्यवस्था केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here