साईमत / विशाखापट्टणम
शहरातील क्रिकेट स्पर्धेत घडलेली हिंसक घटना शहरभर खळबळ उडवून टाकणारी आहे. रन आऊटच्या निर्णयावरून सामन्यात झालेल्या वादातून संतप्त झालेल्या खेळाडूने आणि प्रेक्षकांनी अंपायरवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत अंपायर डोला अजिब बाबू यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा अंपायर बुदुमुरी चिरंजीवी गंभीर जखमी झाला.
माहितीप्रमाणे, सामन्यादरम्यान दोन्ही अंपायर परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मैदानातील काही प्रेक्षक आणि खेळाडूंचा राग तणावात बदलला. कांता किशोर नावाच्या २६ वर्षीय प्रेक्षकाने अंपायरांना शिवीगाळ करत वातावरण आणखी चिघळवले. सामन्यानंतर अजित बाबू चिंरंजीवी आणि त्यांचे मित्र परस्पर वादात अडकले. त्या वादात किशोरने अचानक अंपायर बाबूच्या छातीत चाकू खुपसला. या हल्ल्यात अंपायर बाबू जागीच ठार झाले, तर अंपायर चिरंजीवी जखमी झाले असून पळून वाचले.
स्थानिक पोलिसांनी सांगितले की, आरोपी दारूच्या नशेत होता. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस टीम कार्यरत आहे.
विशाखापट्टणममधील या हिंसक घटनेमुळे क्रिकेट सामन्यांवर आणि मैदानातील सुरक्षा यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
