साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत ध्येय करियर अकॅडमी संचालित जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या आय.एम. विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी कुऱ्हाडचे सरपंचपती डॉ.प्रदीप महाजन होते.
महाराष्ट्र राज्यातून लाखो विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी बसलेले होते. ही परीक्षा १ ली ते ८ वी सेमी, मराठी व इंग्रजी माध्यमातून घेतली जाते. परीक्षेला कुऱ्हाड, नांद्रा, साजगाव, कुऱ्हाड तांडा, लाख तांडा या जिल्हा परिषद व इतर शाळेतील मुले परीक्षेस बसले होते. त्यामधून विहान संजय काळे ह्याने दुसरीमधून राज्यातून पहिला क्रमांक मिळविला. तसेच अक्षरा अशोक भिवसने चौथी, वैशाली कैलास देशमुख पाचवी, ऋतुजा प्रताप चव्हाण सहावी आली आहे. याबद्दल सरपंच डॉ. प्रदीप महाजन, गावातील ग्रा.पं.सदस्य अशोक पाटील, ग्रामस्थ, शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र वितरित केले.
यांचे लाभले सहकार्य
यासाठी आय.एम.विनर जिल्हाप्रमुख तथा कुऱ्हाडचे प्राथमिक शिक्षक राजेंद्र राठोड यांचेे तसेच मुख्याध्यापक श्रीमती कच्छवा, श्रीमती धायगुडे, विलास पाटील, श्री.काळे, श्रीमती तायडे, वासुदेव चव्हाण, सुभाष पवार यांचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ.प्रदीप महाजन यांनी परीक्षेस बसण्यासाठी व स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विलास पाटील यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्री.राठोड, सूत्रसंचालन श्री.काळे तर वासुदेव चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.