घर फोडून ५६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उजेडात
साईमत /चाळीसगाव / प्रतिनिधी
शहरात चोरीचे प्रकार सातत्याने वाढत असून, रेल्वे स्टेशन परिसरात पुन्हा एका आरपीएफ जवानाच्या घरावर चोरांचा धाडसी हल्ला झाला आहे. ९ मार्च रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:४५ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घर फोडून तब्बल ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रारीद्वारे समोर आली.
सागर संजय पाटील (वय ३३), हे चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर आरपीएफमध्ये कार्यरत आहेत. ते ग.स. सोसायटीजवळ, ब्रिज कॉर्नर हॉटेलच्या पाठीमागील भाड्याच्या घरात राहतात. सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप फोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटातील लॉकर तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड हाती केली. या चोरीत ३३ हजार रुपयांची सोन्याचे दागिने आणि २३ हजार रुपयांची रोकड असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल चोरला गेला.
घटनेचा तपास पोलीस कर्मचारी शंकर जंजाळे करीत आहेत. शहरात चोरीचे हे प्रकार सतत वाढत असल्याने नागरिकांनी आपले घर सुरक्षित ठेवण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकारामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन या घटनेचा त्वरित तपास करून चोरांचा पाठलाग करीत आहे.
