साईमत, धुळे । प्रतिनिधी
राज्यातील बोगस रासायनिक खते, बी-बियाण्यांच्या प्रकरणाची ईडी, सीबीआय चौकशी करावी, नाडले गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक ईश्वर पाटील यांनी केली. दरम्यान, तेलंगणातील केसीआर सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीप्रमाणे भविष्यात महाराष्ट्रात पक्षाचे सरकार आल्यास राज्यातील शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी देऊ, अशी आश्वासक भूमिकाही त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. भारत राष्ट्र समितीतर्फे पत्रकार भवनात पत्रकार परिषद झाली. यावेळी समितीचे जिल्हा समन्वयक पाटील, अशोक कद्रे, नाना पाटील, संदीप पवार, सुनीता गोपाळ उपस्थित होते.
ईश्वर पाटील म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर बोगस रासायनिक खते व बी-बियाण्यांची विक्री सुरू आहे. मात्र, शासकीय यंत्रणा सुप्तावस्थेत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी अशा कंपन्यांकडून आर्थिक लाभ मिळविला आहे, असा आरोप करत याबाबत ईडी, सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. शासनाने याची चौकशी करावी. महसूल विभागांतर्गत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तलाठी, सर्कल, तहसीलदार या मंडळींचे रोज नवनवीन कारनामे ऐकून महसूल यंत्रणा भरकटलेली आहे. शासनाने याची दखल घ्यावी, असे पदाधिकारी म्हणाले.