दोन महिन्यांपासून एसीक्यूए फिल्टर प्लांट बंद असल्याचा आरोप; आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी
साईमत /बोदवड/ प्रतिनिधी :
तालुक्यातील वरखेड खुर्द येथे ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमितता, आर्थिक व्यवहार आणि निधीच्या वापराबाबत चौकशी करण्याच्या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस असून, उपोषणकर्ते सचिन आधारसिंग पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल आर्थिक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या आंदोलनाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
वरखेड खुर्द ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेला एसीक्यूए फिल्टर प्लांट गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्लांटमध्ये नाणे टाकून पाणी घेण्याची सुविधा असून, पाच रुपये टाकल्यानंतर नागरिकांना पाणी मिळत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, नाणे टाकण्याची यंत्रणा बंद ठेवून नागरिकांकडून प्रत्यक्ष रोख स्वरूपात दहा रुपये घेतले जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
फिल्टर प्लांट बंद ठेवण्यामागील नेमके कारण काय, नाणे स्वीकारणारी यंत्रणा बंद करण्याचा निर्णय कोणी घेतला, तसेच त्यासाठी ग्रामपंचायतीने अधिकृत ठराव केला आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय प्लांटमधून नागरिकांकडून जमा झालेली रक्कम ग्रामपंचायतीच्या अधिकृत खात्यात किंवा शासकीय तिजोरीत जमा करण्यात आली आहे का, याचीही तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणाऱ्यांना ५० टक्के सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा लाभ घेत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात कराचा भरणा ग्रामपंचायतीकडे केल्याचे सांगण्यात येते. या माध्यमातून सुमारे पाच लाख रुपये जमा झाल्याची चर्चा आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या खात्यात केवळ १५ हजार रुपये शिल्लक असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
गावात ग्रामनिधीतून अपेक्षित विकासकामे झालेली नसताना कराच्या माध्यमातून जमा झालेला निधी नेमका कुठे आणि कशासाठी खर्च झाला, याबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करून लेखापरीक्षण करण्यात यावे, तसेच आतापर्यंत प्राप्त झालेल्या निधीचा आणि झालेल्या खर्चाचा संपूर्ण हिशोब ग्रामस्थांसमोर मांडावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
“ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. निधीचा गैरवापर अथवा भ्रष्टाचार झालेला असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सत्य जनतेसमोर यावे, यासाठीच आमरण उपोषण सुरू केले आहे,” असे उपोषणकर्ते सचिन आधारसिंग पाटील यांनी सांगितले.
१५ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत करण्यात आलेल्या आरोपांची प्रशासनाकडून दखल घेतली जाते का, चौकशीसंदर्भात कोणती भूमिका घेतली जाते आणि पुढील कार्यवाही काय होते, याकडे वरखेड खुर्द ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
