साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहिदांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष महानगर जिल्हा सैनिक आघाडीच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरातील महादेव हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात जिल्ह्यातील शहिद जवानांच्या पत्नी, माता आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून डोळ्यांची सखोल तपासणी करण्यासोबतच विविध आजारांवर आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात आल्या.
या उपक्रमाप्रसंगी भाजपचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका उज्वला बेंडाळे आणि पितांबर भावसार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सैनिक आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी सैनिक डी. एम. बडगुजर यांच्यासह आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करत राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे.
