नंदुरबार जिल्ह्यात परिस्थिती गंभीर; 14 पोल्ट्री फार्ममध्ये कारवाई, इतर ठिकाणी तपासणी सुरू
साईमत / नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. आतापर्यंत सहा पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर ‘कलिंग’ मोहीम राबवण्यात येत आहे.
या मोहिमेत आतापर्यंत सुमारे 3 लाख 89 हजार कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले आहे. तसेच 21 लाख 61 हजार अंडी आणि सुमारे 50 टन पक्षी खाद्य नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोल्ट्री व्यवसायावर मोठा आर्थिक फटका बसला आहे.
नवापूर तालुक्यातील एकूण 35 पैकी 14 पोल्ट्री फार्ममध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कारवाई करण्यात आली आहे. इतर फार्मचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील अहवालांनुसार कलिंग मोहिमेची व्याप्ती वाढण्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केली आहे.
बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत देखरेख सुरू आहे.
