साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय (ओबीसी) पिछडावर्ग, छत्रपती क्रांती सेना, मौर्य क्रांती संघ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी वारकरी संघ यांच्यासह अन्य संघटनेच्यावतीने महाराष्ट्र बंद अंतर्गत धरणगावला सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी शहर बंदसह रास्ता रोको केला. आंदोलनाचे नेतृत्व बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक राजेंद्र माळी तसेच भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील यांनी केले. तत्पूर्वी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश महासचिव मोहन शिंदे, शिवसेना (उबाठा) सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अरविंद देवरे, राष्ट्रीय आदिवासी परिषदेचे ताराचंद भिल, शहरप्रमुख भागवत चौधरी, गोपाल पाटील, सिताराम मराठे, गौतम गजरे, नगर मोमीन आदी मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आर.एस.एस., भाजपच्या षडयंत्राच्या विरोधात, बहुजन महापुरूषांचा, संविधान व राष्ट्रप्रतिकांचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडे उर्फ मनोहर कुलकर्णीला अभय देणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात धरणगाव शहर बंदासह रास्ता रोको करण्यात आला. बहुजनवादी संघटनेने पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदला धरणगाव शहरासह पिंप्री व तालुका परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी शिवसेनेचे (उबाठा) नेते गुलाबराव वाघ, भारत मुक्ती मोर्चाचे मोहन शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, अरविंद देवरे आदींनी सरकार संविधान विरोधी कार्य करत असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव मोहन शिंदे, राजेंद्र वाघ (माळी), युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगराध्यक्ष निलेश चौधरी, उबाठाचे शहर प्रमुख भागवत चौधरी, अरुण पाटील, कृष्णा मोरे, नगर मोमीन, नदीम काझी, गौतम गजरे आदींना रास्ता रोको आंदोलनावेळी पोलिसांनी ताब्यात घेत सोडून दिले. रास्ता रोको आंदोलन दरम्यान पो.नि.उद्धव डमाळे यांच्या आदेशान्वये पो.हे.कॉ. मिलिंद सोनार, पो.ना. प्रमोद पाटील, पो.कॉ.वैभव बाविस्कर, विनोद संदानशिव, नागराज साळुंखे, शामराव मोरे, राहुल बोरसे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.